औरंगाबाद : कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातील अनेक शाळा फीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी आपण ऐकल्या असतील. पण आता औरंगाबादेतील गुरुकुल शाळेने फी भरण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे आणि याचं व्याज शाळा भरण्यास तयार आहे. यापूर्वी उच्च शिक्षणासाठी बँका कर्ज देत असल्याचं तुमच्या ऐकीवात असेल. मात्र आता गुजरातस्थित एका फायनान्स कंपनीने शाळेची फी भरण्यासाठी कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.


औरंगाबादच्या गादीयाविहार शहानूर मिया दर्ग्याजवळ गुरुकुल इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. या शाळेने कोरोनाचे संकट पाहता पालकांसाठी शाळेची फी भरण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. या शाळेत गुजरातमध्ये असलेल्या credin नावाच्या फायनान्स कंपनीकडून हे कर्ज उपलब्ध करुन दिले आणि शाळा कर्जावरील व्याज भरायला तयार झाली आहे.


या कर्ज योजनेविषयी बोलताना या शाळेचे संस्थाचालक डॉ.सतीश तांबे सांगतात की, "सध्या कोरोनाच्या संकटात अनेक पालकांसमोर शाळेची फी कशी भरायची हा प्रश्न आहे. तर आमच्यासमोरही शाळेचे चक्र चालू ठेवायचं हाही प्रश्न होताच. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावे म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरुन शिक्षकांना बोलावलं आहे. त्यांचा महिन्याकाठीचा पगार द्यावा लागतो, शाळेचं भाडेही भरावं लागतं. हे सर्व काही पालक फी भरतात त्यावर अवलंबून असतं. एरव्ही पालक तीन टप्प्यात फी भरायचे. त्यातही सुविधा मिळावी म्हणून आता महिन्याकाठी फी भरता यावी यासाठी या फायनान्स कंपनीकडून पालकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कर्जावरील व्याज आम्ही भरणार आहोत त्यामुळे पालकांना अधिकचा आर्थिक भुर्दंड बसणार नाही."



यापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी एकाच वेळी आणि क्वॉर्टर्ली भरण्याची सोय होते. आता फायनान्स कंपनीकडून प्रतिमहिना रक्कम भरण्याची व्यवस्था करुन दिली आहे. यासाठी आपण पहिलीच्या वर्गाचे उदाहरण घेऊ. पहिली वर्गासाठी एकरकमी फी 44 हजार रुपये आहे. क्वॉर्टर्ली म्हणजेच तीन हफ्ते केल्यास 48 हजार रुपये भरावे लागतात. हेच 48 हजार रुपये आता फायनान्स कंपनी भरणार आहे.


पालकांची प्रतिक्रिया का?
यावर आणि पालकांना काय वाटतं हेही जाणून घेतलं. पंकज देशपांडे आणि संदीप पवार या पालकांनी या स्कीमचं स्वागत करु असं म्हटलं. "आम्हाला तर एरव्ही देखील तेवढेच पैसे द्यावे लागत होते. आता त्यात महिन्याला पैसे भरावे लागतील. आमच्यासाठी एवढं चांगलं आहे की त्यावर कुठलंही अधिक व्याज लागणार नाही," असं ते म्हणाले.


कोरोना संकटात संस्थाचालकांनी शोधलेली संध : शिक्षणतज्ज्ञ
शिक्षण तज्ज्ञ डॉ. एस बी कुलकर्णी यांना मात्र ही कोरोनाच्या संकटात संस्थाचालकांनी शोधलेली संधी वाटते. कोरोनाच्या संकटांमध्ये ॲडमिशनची संस्थाचालक इतकी घाई का करत आहेत हा प्रश्न त्यांनी विचारला आहे.


कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना बेरोजगार व्हावं लागले आहे तर अनेकांचे पगार कपात झाले आहेत. त्यामुळे ही कर्जाची स्कीम शाळेने दिली आहे. असं असलं तरी ही स्कीम खरोखरच विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी आहे की शाळेला हे तुम्हीच ठरवा. मात्र एरव्ही उच्च शिक्षणासाठी बँका कर्ज देत होत्या, आता फायनान्स कंपन्या शालेय शिक्षणासाठीही कर्ज द्यायला तयार झालेल्या आहेत हे नक्की.


कर्जबाजारी पालक आपला मुलगा शिक्षण घेईल, मोठा अधिकारी होईल आणि आपलं कर्ज फेडेल, या आशेने सर्वतोपरी प्रयत्न करुन शिक्षण देतात. मात्र त्यांना आता मुलांना शिकवायचं असेल तर पहिलीपासूनच कर्जबाजारी व्हावे लागेल. ही या बातमीची एक बाजू. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एरव्ही आपण उच्चशिक्षणासाठी बँकांकडून कर्ज घेतोच की? आता पहिलीपासून कर्ज उपलब्ध झाला आहे एवढंच. या बातमीची आणखीन एक बाजू आहे ती म्हणजे शाळा चालवण्यासाठी, शाळेचे चक्र गतिमान ठेवण्यासाठी बँका आता विद्यार्थ्यांना दिलेल्या कर्जावरील व्याज भरायला तयार झालेल्या आहेत. भविष्यात अशा अनेक कर्ज योजना आल्या तर त्यात आश्चर्य वाटायला नको.