अ‍ॅपशहर

प्रस्तावित दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्ग रद्द

म टा प्रतिनिधी, औरंगाबादउत्तर भारतात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्गाकरिता सर्वेक्षण करण्यात आले...

Maharashtra Times 21 Aug 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्तर भारतात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्गाकरिता सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्याला तीन वर्षे उलटल्यानंतर हा मार्ग तोट्याचा असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) देण्यात आली. त्यामुळे प्रस्तावित दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्ग रद्द करण्यात आला आहे.

औरंगाबादहून दिल्ली, अजमेर, जयपूरकडे धावणाऱ्या रेल्वे मनमाडमार्गे उत्तर भारतात जातात. त्याकरिता औरंगाबादहून मनमाडपर्यंतचे १८८ किलोमिटर अंतर तोडावे लागते. दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्ग टाकल्यास हे अंतर कमी होईल व मध्यप्रदेश, पंजाबसह इतर राज्यातून येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा लाभ घेता येईल,असा विचार चार वर्षांपूर्वी पुढे आला. हा रेल्वेमार्ग टाकण्यासाठी स्थानिक आमदार व स्थानिक रेल्वे संघटनेने पाठपुरावा केला. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या कार्यकाळात सर्वेक्षणाला मान्यता देण्यात आली. तीन वर्षांपूर्वी रुडकी आयआयटीने सर्वेक्षण करून ते रेल्वे विभागाकडे सादर केले. हा रेल्वेमार्ग फायदेशीर असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

दरम्यान, हा रेल्वेमार्ग राष्ट्रीय महामार्ग २११च्या बांधकामासोबतच पूर्ण करावा, अशी मागणी पुढे आली. मात्र, ५ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद दौऱ्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गासोबत रेल्वे मार्ग टाकण्याबाबत उदासीनता दाखवली. त्यामुळे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अनंत बोरकर यांनी १२ ऑगस्ट रोजी या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यात या रेल्वेमार्गाची आवश्यकता, राष्ट्रीय महामार्गासोबत बांधकाम झाल्यास रेल्वे विभागाचा संभाव्य लाभ याची माहिती सादर केली होती. शिवाय या मार्गाच्या सद्यस्थितीची विचारणा केली होती. पंतप्रधान कार्यालयाने १७ ऑगस्ट रोजी या तक्रारीला उत्तर पाठविले आहे. रेल्वे विभागाचे एस. सी. जैन यांच्याकडून पंतप्रधान कार्यालयातर्फे पाठविलेल्या उत्तरानुसार, या ९३ किलोमिटर मार्ग तोट्याचा असल्याचे कळवण्यात आले आहे. मालवाहतुकीसाठी हा मार्ग लाभदायक नसल्याचे कळवले आहे. यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

\Bमार्च महिन्यातील उत्तर वेगळेच \B

मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी या रेल्वेमार्गाबद्दल माहिती अधिकारात रेल्वे विभागाकडे माहिती मागितली होती. मार्च २०१८ मध्ये मिळालेल्या उत्तरात दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्गे सर्वेक्षण सुरू असल्याचे कळवण्यात आले होते. पण, मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या काळात हा मार्ग एकदम तोट्यात कसा गेला? नांदेड ते मनमाड मार्गावर डिझेल इंजिन धावतात, त्यांचा मनमाडचा फेरा कमी होऊ शकतो. विद्युतीकरण होईपर्यंत हा मार्ग वापरल्यास डिझेलवरील होणारा खर्च वाचणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर स्पष्ट मिळाले आहे. पण, हा मार्ग रेल्वेच्याच फायद्याचा आहे. या मागणीसाठी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करणार आहोत.

-अनंत बोरकर, अध्यक्ष मराठवाडा रेल्वे कृती समिती

अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्गही तोट्याचा होता. तरीही या रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तोच निकष दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्गासाठी का लावला जात नाही. औरंगाबादवरच अन्याय का? प्रत्येक बाबीसाठी नागरिक कोर्टात जाऊ शकत नाहीत. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करण्याची गरज आहे.

-ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

……………

सध्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा मार्ग फायद्याचा आहे का? तुलनाच करायची असेल, तर सगळ्यांच प्रकल्पाची करा. चाळीसगाव-दौलताबाद रेल्वेमार्ग आवश्यक असून त्यासाठी पाठपुरावा केला आहे. आता रेल्वे अधिकारी दिशाभूल करत आहेत. याबाबत मी रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा करून मागणी लावून धरणार आहे.

-चंद्रकांत खैरे, खासदार, औरंगाबाद

……………

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज